येणारे कार्यक्रम

निर्मिती परिवारतर्फे आयोजित उत्सव, स्पर्धा आणि कार्यशाळा

किल्ला स्पर्धा व दुर्ग भ्रमंती — कलानिधी गड २०२६

किल्ले स्पर्धेतून 'कलानिधीगडा'च्या साक्षीनं दुष्काळमुक्तीचा एल्गार

निर्मिती, आपटे फौंडेशनच्यावतीने सलग २६ वर्षे उपक्रम

उत्तूर - उत्तूर येथील निर्मिती परिवार आणि मुकुंदरावदादा आपटे फौंडेशनच्यावतीने सलग २६ व्या वर्षी दिवाळी निमित्त किल्ले स्पर्धा व गडभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची स्पर्धा परंपरा म्हणून न राहता तिने एक मोठे सामाजिक प्रबोधनाचे रूप घेतले आहे. यंदा स्पर्धकांसाठी चंदगड तालुक्यातील 'कलानिधीगड' हा मुख्य विषय देण्यात आला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून बालमावळ्यांनी किल्ल्यांची केवळ प्रतिकृती उभारायची नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरगामी जलव्यवस्थापन याबद्दल प्रबोधन करायचे आहे. यानिमित्ताने जलसाक्षरता आणि दुष्काळमुक्तीचा एल्गार केला जाणार आहे.

बालवयातच शिवविचार रुजावेत आणि सुसंस्कार पिढी घडावी यासाठी किल्ले स्पर्धा व गड भ्रमंती आयोजित केली आहे. मंडळाच्या वतीने स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांना किल्ल्याचा नकाशा दिला जातो. मुले इतिहासाची पुस्तके वाचून किल्याची इत्यंभूत माहिती घेऊन किल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करतात. संपूर्ण उत्तूरमधे सर्व ठिकाणी एकच गड तयार केला जातो. दिवाळीची सुट्टी सुरू झाली की गावातील प्रत्येक गल्लीत मुलांची किल्ला बनवण्यासाठी लगबग उडते. गावात शिवमय वातावरण तयार होते. यासाठी बालचमूला पालक आवर्जून मदत करतात. सर्वजण भारावून जातात. शिवसंस्कार घडवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. यावर्षी राज्यावर असलेले दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन मंडळाने शिवकालीन जलव्यवस्थापन यावर भर दिला आहे. किल्ला तयार करतांना मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरगामी जलव्यवस्थापन याबद्दल प्रबोधन करायचे आहे.

स्पर्धा नव्हे संस्कारवर्ग

किल्ले प्रतिकृती परीक्षणवेळी मुले अक्षरशः शिवशाही उभी करतात. पोवाडे गातात, ऐतिहासिक नाट्यछटा सादर करतात. स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बक्षीस वितरण हे एखाद्या गडावरच होते. या ठिकाणी इतिहास तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गडभ्रमंती होते. स्वच्छता केली जाते. ऐतिहासिक व्याख्यान होते. अशा नानाविध वैशिष्ट्यमुळे ही स्पर्धा एक संस्कारवर्ग ठरली आहे.

बच्चे कंपनीसाठी गड भ्रमंती

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश किल्ल्यासह रायगड, प्रतापगड, अवचितगड किल्ल्यावर स्पर्धेतील सहभागी मुलांना त्यांच्या मातांसह भ्रमंती घडवून आणणारे निर्मिती आणि आपटे फौंडेशन महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असावे. यावर्षीच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण कलानंदी गडावर केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांच्या सहकार्याने बच्चे कंपनीला गड भ्रमंती घडवली जाणार आहे.

मुलांसाठी मार्गदर्शक सूचना

किल्ला तयार करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. विहीर, तलाव यांच्या काठावर तसेच विजेचे पोल, वीज वाहिन्या यांच्या खाली किल्ला तयार करू नये, विद्युत पुरवठा अधिकृत घ्यावा शिवाय चार फुटापेक्षा जास्त किल्याची उंची नसावी यासारख्या काही मार्गदर्शक सूचना मंडळाचे अध्यक्ष महादेव मिसाळ, उपाध्यक्ष व सरपंच किरण आमनगी, सचिव चंद्रशेखर आमनगी, विजय पाकले, सौरव वांजोळे, अशोक जाधव, अभि देसाई, बाबुराव पाटील, विजय पाटील यांनी स्पर्धकांना केल्या आहेत.

Download following forms for entry